top of page
FB_IMG_1638002282318.jpg

AKHIL BADWAIK

अखिलची नाळ गेल्या आठ वर्षांपासून परिवर्तनशी जोडली गेली आहे. सातत्याने परिवर्तनचं काम करत असताना त्याला  आपल्याला आयुष्यात नक्की काय करायचंय ह्याची जाणीव झाली. एकदा ध्येयावर शिक्कामोर्तब झाल्यावर अखिलने शिक्षण संपवलं आणि 'साथी'मध्ये काम करायला सुरुवात केली, जी संस्था 'rescue and restoration' चं महत्वाचं काम करते. फेब्रुवारी 2020 मध्ये 'साथी'कडे नेपाळहून पळून आलेली 9 अल्पवयीन मुलं आली. आर्थिक चणचण, योग्य मार्गदर्शनाची वानवा, कुटुंबियांशी न पटणे अशा अनेक कारणांमुळे बिहार-नेपाळ सीमेवरून ही मुलं पळून आली होती. अखिल आणि त्याच्या साथी टीमने या मुलांना योग्य मार्गदर्शन करून मायदेशी परत पाठवण्यासाठी जवळपास आठ महिने कष्ट घेतले. 

 

अर्थातच, अशी कामं सरळ सरधोपट नसतात. CWC, DCPO, Railway Childline अशा अनेक सरकारी bodies यात सहभागी होत्या. या सगळ्यांची एकत्र मोट बांधून कागद-व्यवहार करणं किंवा वेगवेगळ्या परवानग्या मिळवणं,आणि ह्या मुलांचं समुपदेशन करणं, हे सगळंच आव्हानात्मक होतं. सुरुवातीला सगळी खोटी माहिती पुरवणाऱ्या या मुलांना आश्वासक वाटेल असं वातावरण तयार करून त्यांना बोलतं करणं, या मुलांचे खरे पत्ते शोधून काढणं हे अतिशय कठीण होतं. एकीकडे देशात covid थैमान घालत असताना या सगळ्या गोष्टी पार पाडण्याचं मोठं काम अखिल आणि त्याच्या टीमने केलं.

 

आठ महिन्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर अखेरीस ऑक्टोबर 2020 मध्ये रेल्वे पोलिस आणि समाजसेवकांच्या एका तुकडीबरोबर ही मुले बिहारला पाठवण्यात आली आणि पुढे त्यांना त्यांच्या आई वडिलांकडे सोपवण्यात आलं. 

 

कसलाही बोभाटा न करता, सतत प्रकाशझोताबाहेर राहून आपलं काम करत राहणाऱ्या अखिलचा आम्हा सगळ्यांना अभिमान वाटतो. परिवर्तनच्या सगळ्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देणाऱ्या अखिलचं मनापासून कौतुक!

bottom of page