top of page
WhatsApp Image 2022-04-12 at 11.56_edited.png

ANIKET MUNDADA

आपण समाजाचं देणं लागतो' हे अगदी शाळेपासून कानावर पडलेलं, डोळ्यांना सरावलेलं आणि त्यामुळे कदाचित थोडं बोथट झालेलं वाक्य! ते बहुतेकांना पटलेलं असतं, पण त्याला जागण्याचं धाडस काही सगळ्यांना करवत नाही. धाडसच म्हणावं लागेल कारण समाजसेवा करण्याचा आव आणता येत नाही. विशेषतः आपली नोकरी/ व्यवसाय पाचव्या गियरमध्ये धावता ठेऊनही तेवढ्याच ऊर्मीने grass root levelवर कामासाठी उतरायला वेगळया levelचं passion लागतं.

 

परिवर्तनच्या प्रत्येक जुन्या कार्यकर्त्याकडे अनुभवाचा विकिपीडिया आहे. नुसतं systemला target करून उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा systemमध्ये उतरून उत्तरं शोधूया, दुरून साजरी दिसणारी कामं पार पाडताना खरोखर येणारे अडथळे स्वतः अनुभवूया, या विचारांतून सुरू झालेल्या परिवर्तनच्या पहिल्या काही कार्यकर्त्यांमध्ये अनिकेत होता. ह्याशिवाय 'रक्ताचं नातं' आणि ह्यासारख्या अजून सहा NGOs बरोबर अनिकेत काम करतो.

 

गेल्या वर्षी मार्च मध्ये Covid पुण्यात येऊन थडकला आणि त्याची लागण झालेल्या पहिल्या काही घरांमध्ये अनिकेतचं घर सापडलं. ते सुरुवातीचे काही महिने असे होते की अशी नुसती बातमी ऐकूनही कित्येकांचं अवसान गळायचं. पण त्याही परिस्थितीत 'आता पुढचे काही महिने Covid Warrior बनून आपल्याला लोकांची बिनदिक्कत सेवा करता येईल' हा विचार अनिकेतच्या मनात आला. मग सुरू झाली फूड पॅकेट्स, किराणा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायची मोहिम! करोनाची दुसरी लाट आली तेंव्हा झंझावाती वेगानं अनिकेत आणि परिवर्तनच्या अनेक कार्यकर्त्यांनी 170पेक्षा अधिक लोकांना रक्त आणि प्लाझ्मा मिळवून दिला. Bitwise Foundation या कंपनीतर्फेही अनिकेतने Covid रुग्णांना मदत मिळवून दिली.

 

लहानपणी वाड्याच्या गणपती मंडळाचं काम करणाऱ्या छोटया शिलेदाराला याची कल्पनाही नव्हती की ते करत असताना नकळत त्याच्यात भिनत जाणारं सामाजिक भान त्याला आता कायम पुरणार आहे. मी-माझं-मला यांना ओलांडून आयुष्य व्यापून उरणार आहे. निःस्वार्थ कामाचं बाळकडू देणारं घर, आणि पावलागणिक हळुहळू वाढत जाणारं परिवर्तनचं कुटुंब यांच्याबद्दल भरभरून बोलणाऱ्या अनिकेतमधलं passion उत्तरोत्तर असंच वाढत जावो, आणि वाचणाऱ्या प्रत्येकाला त्याचा postive संसर्ग होत राहो!

bottom of page